Saturday, 4 December 2021

हरिश्चंद्रगड - ट्रेकर्ससाठी पर्वणी (दोन दिवस)

 

हरिश्चंद्रगड 

माहिती 

हरिश्चंद्रगड किल्ला ठाणे,पुणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्य़ांच्या सीमा जिथे एकत्र येतात त्या मोक्याच्या ठिकाणी वसला आहे.महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांप्रमाणे इथे भक्कम बुरूज,लांबलचक भिंती आणि दरवाजे नाहीत.हरिश्चंद्रगडाचा डोंगर हा एका वेगळ्या डोंगरधारेवर वसलेला असुन त्याला नैसर्गिकरित्या कडे लाभले आहेत.हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील बहुतांशी दुर्गप्रेमींचा लाडका किल्ला आहे तो तिथे असलेल्या कोकणकड्यामुळे.

कसे जावे

हरिश्चंद्रगडाच्या विशेष स्थानामुळे ठाणे,पुणे आणि अहमदनगर या तिन्ही जिल्ह्य़ातून इथे येण्यास मार्ग आहेत 

खिरेश्वर - हरिश्चंद्रगडावर येण्याचा सर्वात प्रचलित मार्ग हा पुणे जिल्ह्य़ातील खिरेश्वर या ठिकाणाहून येतो. खिरेश्वर हे गाव पुणे जिल्ह्य़ातील जुन्नर तालुक्यात वसले आहे.मुंबई ते खिरेश्वर अंतर हे १४५ कि.मी. आहे.मुंबई - कल्याण - माळशेज घाट - खुबी फाटा मार्गे खिरेश्वर गाठता येते.पुणे ते खिरेश्वर अंतर हे १२५ कि.मी. आहे.पुणे - नारायणगाव - जुन्नर- खुबी फाटा मार्गे खिरेश्वर गाठता येते.मुंबईहून रेल्वेने ठाणे किंवा कल्याण येथून जुन्नर किंवा अहमदनगर येथे जाणारी एस.टी पकडल्यास खुबी फाट्याला उतरून पिंपळगाव जोगा धरणाच्या कडेने जाणारा रस्ता खिरेश्वरला येतो (अंतर ४ कि.मी).तसेच पुण्याहून जुन्नरला एस.टी बदलून पुढे माळशेज घाटाच्या दिशेने जाणारी एस.टी पकडून खुबी फाट्याला उतरता येते.
खुबी फाट्याहून येणारा रस्ता खिरेश्वर गावाच्या पुढे एका डोंगराजवळ संपतो आणि तिथे हरिश्चंद्रगडावर जाणारी पायवाट सुरू होते.घनदाट जंगलातून जाणारी पायवाट ही अरुंद मार्गावरून आपल्याला समोर दिसणार्‍या खिंडीत आणून सोडते.
आपल्याला पायवाटेच्या सुरुवातीपासून ही खिंड खुणावत रहाते.या खिंडीला 'टोलारखिंड' असे म्हणतात.
खिरेश्वर गावातून टोलारखिंडीत येणारा मार्ग हा खूप कठीण नसला तरी अरुंद आणि दमछाक करणारा आहे.खिरेश्वर गावातून टोलारखिंडीत येण्यासाठी  खिरेश्वरहून चढताना साधारण दीड तास आणि टोलारखिंडीतून उतरताना साधारण सव्वा तास लागतो.ही वाट घनदाट जंगलातून जात असल्याने येथे नवखा पर्यटक वाट चुकण्याची शक्यता आहे म्हणून पहिल्यांदा येताना खिरेश्वर गावातून एखादा माहितगार बरोबर असल्यास योग्य वाटेने हरिश्चंद्रगड गाठता येतो आणि वाट शोधायला लागणार नसल्याने वेळही वाचतो.टोलारखिंडीतून एक रस्ता सरळ मागच्या गावात उतरतो तर दुसरा रस्ता डावीकडील शिळांमधून काढलेल्या अरुंद कठीण वाटेने (राॅक पॅच)  हरिश्चंद्रगडावर येतो.टोलारखिंडीतून डावीकडे वळल्यावर लगेच राॅक पॅचला सुरुवात होते. पावसाळ्यात खडक शेवाळे साचून निसरडे होतात त्यामुळे हा राॅक पॅच पार करताना जपून पार करावा लागतो.एका बाजूला खोल दरी आणि दुसर्‍या बाजूला हरिश्चंद्रगडाची भिंत अशा अरुंद वाटेवरून जाणारा हा पॅच चढताना ट्रेकर्सचा कस लागतो.हा राॅक पॅच चढताना आपल्याला दरीच्या बाजूला काही ठिकाणी रेलींग दिसतील.ज्यांना उंचीवरून खाली बघितल्यास घेरी येण्याचा पूर्वानुभव असेल त्यांनी हा टप्पा पार करताना मध्ये विश्रांती घेऊन तो पार करावा.हा टप्पा पार करायला साधारण पाऊण तास लागतो.राॅक पॅच पार करून पुढे 
आल्यावर सपाटीचा भाग सुरू होतो.या ठिकाणाहून तुम्ही पिंपळगाव जोगा धरणाच्या नयनरम्य देखाव्याचा आनंद घेऊ शकता.या पुढील वाट ही बरीचशी सोपी आणि रूंद आहे. पायवाटेसारख्या रूंद वाटेने छोट्या छोट्या काही टेकड्या मागे टाकत आपण काळ्या पाषाणात कोरलेल्या हरिश्चंद्रेश्वर मंदिराजवळ येउन पोचतो.हा शेवटचा दोन ते अडीच तासांचा टप्पा निसर्गरम्य वातावरणात अगदी सहज पार करता येतो.उन्हाळ्यात इथे येताना खिरेश्वर गावातून पाणी भरून घेणे आवश्यक आहे.या पायवाटेवर डावीकडे हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला खुणावतो.ही पायवाट काही ठिकाणी अधूनमधून छोट्या जंगलवजा भागातून जाते परंतु एकूण या मार्गावर फारशी सावली मिळत नाही.

पाचनई- .पाचनई हे अहमदनगर जिल्ह्यात वसलेले एक टुमदार गाव आहे.मुंबईहून इथे येण्यास दोन मार्ग आहेत.पहिला मार्ग मागील सांगितलेल्या मार्गावरून पुढे खुबी फाटा - ओतूर - ब्राह्मणवाडा - कोतूळ - कोठाळे -पाचनई  (मुंबई - कल्याण - माळशेज घाट - खुबी फाटा - ओतूर - ब्राह्मणवाडा - कोतूळ - कोठाळे -पाचनई) असा आहे तर दुसरा मार्ग मुंबई - शहापूर - इगतपुरी - घोटी - भंडारदरा - राजूर - कोठाळे -पाचनई असा आहे.पहिल्या मार्गाने पाचनईचे अंतर मुंबईहून २२५ कि.मी आणि दुसर्‍या मार्गाने हे अंतर २१० कि.मी आहे.पुण्याहून आपण इथे  पुणे - नारायणगाव - ओतूर - ब्राह्मणवाडा - कोतूळ - कोठाळे -पाचनई मार्गे येऊ शकतो.पुण्याहून पाचनईचे अंतर १६० कि.मी आहे.पाचनई हे अंतर्गत भागातील एक छोटे गाव असल्याने इथे येण्यासाठी मुंबई किंवा पुण्याहून थेट एस.टी नाही.मुंबईहून येताना एस.टी अथवा रेल्वेने इगतपुरी गाठून पुढे एस.टीने राजूरला यावे लागते आणि राजूरहून कोठाळेमार्गे पाचनईला यावे तसेच पुण्याहून एस.टी मार्गे थेट कोतूळ किंवा ओतूरला एस.टी बदलून कोतूळला यावे.कोतूळहून दिवसाला काही ठराविक वेळी पाचनईसाठी एस.टी बस सुटतात.
दोन ते तीन एस.टी बस बदलण्यापेक्षा स्वतःच्या वाहनाने पाचनईला येणे सोयीस्कर ठरते.

पाचनई गावातून सोप्या वाटेने दीड ते दोन तासात आपण हरिश्चंद्रेश्वर मंदिराजवळ येउन पोचतो.पाचनई गावातून हरिश्चंद्रगड गाठणे हा वरील नमूद केलेल्या तीन मार्गातील सर्वात सोपा मार्ग आहे.पाचनई गाव हे हरिश्चंद्रगडाच्या सर्वात जवळ वसलेले असल्याने  लागणारा वेळ हा तीन मार्गातील सर्वात कमी आहे.
पाचनई गावातून एका मळलेल्या वाटेवरून आपला प्रवास सुरू होतो.सुरूवातीला लागणारा चढ हा वेळेगणीक चढा होत जातो आणि साधारण तासाभराच्या खड्या चढानंतर आपण डोंगरधारेवरून एका सपाटीच्या भागावर येतो.पाचनईतून निघताना बर्‍यापैकी रूंद असलेली ही वाट चढागणीक अरुंद होत जाते.एका बाजूला दरीत वहाणारी मंगळगंगा नदी,समोर त्याच्या लांबट अर्धत्रिकोणी आकारामुळे लक्ष वेधून घेणारा कलाडगड आणि दुसर्‍या बाजूस हरिश्चंद्रगडाचा खडा पहाड यामधून जाणारी वाट पावसाळ्यात असंख्य छोट्या धबधब्यांचे चित्रवत निसर्ग सौंदर्य दाखवते.ही वाट काही ठिकाणी इतकी अरुंद होते की डोंगराचा कातळ पोखरून पुढे जाते.
सपाटीच्या भागावर आल्यावर मंगळगंगा नदीच्या प्रवाहामुळे थोडा खडकाळ भाग लागतो.तो पार करून पुढील मार्ग घनदाट जंगलातून जातो.मातीच्या रूंद रस्त्यावरून लागणारा चढ पार केल्यानंतर आपण हरिश्चंद्रेश्वर मंदिराजवळ पोचतो.पहिला अवघड चढ चढून सपाटीच्या भागावर आल्यानंतर तिथून हरिश्चंद्रगडावर येण्यासाठी पाउण ते एक तास लागतो.
या शेवटच्या पाउण तासातील टप्पा घनदाट जंगलातून जात असल्याने इथे सावली मिळते.

नळीची वाट  - हा ठाणे जिल्ह्यातून हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर येणारा मार्ग आहे. हा वरील नमूद केलेल्या तीन मार्गातील सर्वात कठीण मार्ग आहे.या मार्गाची सुरुवात ठाणे जिल्ह्यातील वाल्हिवळे गावातून होते.वाल्हिवळे गावाचे अंतर मुंबईहून १२० कि.मी आणि पुण्याहून १६० कि.मी आहे.मुंबईहून कल्याण-मुरबाड - मोरोशी (ठाणे जिल्हा) मार्गे वाल्हिवळे गावात पोचता येते.पुण्याहून पुणे - नारायणगाव - ओतूर- माळशेज घाट - मोरोशी (ठाणे जिल्हा) मार्गे वाल्हिवळे गाव गाठता येते.
हा मार्ग बहुतांशी उभ्या कातळामधून जात असल्याने प्रस्तरारोहणाचे (Rappelling) तंत्र अवगत असलेल्यांनीच या मार्गाने हरिश्चंद्रगडावर यावे.हा मार्ग समोर उभा कातळ आणि पाठीमागे खोल दरी अशा पद्धतीने दोन समांतर उभ्या डोंगर कड्यांच्या मधून जात असल्याने नळीसारखा आहे म्हणून या मार्गाला नळीची वाट म्हणतात.या मार्गाने हरिश्चंद्रगडावर येण्यासाठी ८ ते १० तास लागतात.

चढण्यास / उतरण्यास लागणारा वेळ -

खिरेश्वर मार्ग -
साडेचार तास  (चढण्यास) / ३ तास ५० मिनिटे (उतरण्यास)

१. दीड तास (चढण्यास)/ सव्वा तास (उतरण्यास)- खिरेश्वर ते टोलारखिंड / टोलारखिंड ते खिरेश्वर
२. पाउण तास(चढण्यास)/ ३५ मिनिटे (उतरण्यास)
(राॅक पॅच) -टोलारखिंड ते राॅक पॅचच्या वरील सपाटीचा भाग  /  राॅक पॅचच्या वरील सपाटीचा ते टोलारखिंड
३. सव्वा दोन तास (चढण्यास) / दोन तास (उतरण्यास) - राॅक पॅचच्या वरील सपाटीचा भाग (सुरुवात) ते हरिश्चंद्रेश्वर मंदिर  / हरिश्चंद्रेश्वर मंदिर ते राॅक पॅचच्या वरील सपाटीचा भाग (शेवट)

पाचनई मार्गे -
दोन तास (चढण्यास)/ एक तास  पस्तीस मिनिटे (उतरण्यास) 

एक तास (चढण्यास)/ पाउण तास(उतरण्यास)- 
पाचनई गाव - चढाईच्या शेवटी असलेल्या सपाटीच्या भागाची सुरुवात
 एक तास (चढण्यास) / पन्नास मिनिटे (उतरण्यास)- चढाईच्या शेवटी असलेल्या सपाटीच्या भागाची सुरुवात - हरिश्चंद्रेश्वर मंदिर

टीप - वर नमूद केलेला वेळ हा चढण्यास  आणि उतरण्यास साधारणपणे लागणारा वेळ आहे. ट्रेकिंग करणारे ट्रेकर्सची संख्या,त्यांचा वेग आणि त्या वेळेस असणारे वातावरण (दाट धुके,पाऊस किंवा उन्हाळा) यानुसार वेळेत बदल होतो.

प्रेक्षणीय ठिकाणे 

हरिश्चंद्रेश्वर मंदिर - हेमाडपंती बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेले, संपूर्णतः एका काळ्या पाषाणात घडवलेले हे मंदिर हरिश्चंद्रगडावरील प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे.खिरेश्वरहून किंवा पाचनई गावातून येताना या मंदिराचा सोनेरी कळस प्रथम दृष्टीस पडतो.मंदिराच्या मुख्य आवाराला संरक्षक भिंतीने सुरक्षित केले आहे.मंदिराच्या मुख्य आवारात प्रमुख शिवमंदिराबरोबर काळ्या पाषाणातील प्रेक्षणीय शिल्पे आणि शेंदूरात घडवलेल्या गणेश मूर्तींचा समावेश आहे.
शेंदूर पाण्यात मिसळत नसल्याने त्या काळातील शिल्पकारांनी शेंदूराचा वापर केला असावा.या कारणामुळेच त्या काळातील मंदिरांच्या आतील इतर शिल्पांची जरी पावसामुळे पडझड झाली असेल तरी शेंदूरात घडवलेल्या मूर्ती या पावसामुळे विशेष प्रभावित झालेल्या आढळत नाहीत.
मंदिर परिसराचे छोटेखानी प्रवेशद्वार, त्यावरील घंटा आणि बाजूलाच असलेल्या त्रिशूळामुळे शोभून दिसते.
मुख्य मंदिरात मध्यभागी असलेल्या शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक सुरु असतो.मुख्य मंदिराच्या मागील बाजूस एक गुहा आहे.या गुहेत वास्तव्य करता येते.मुख्य मंदिराच्या उजवीकडे पडझड झालेल्या काही  मंदिरांचे अवशेष आहेत.मंदिराच्या डाव्या बाजूला काळ्या पाषाणात कोरीव काम केलेली काही शिल्पे आढळतात.मंदिराच्या उजवीकडे मंदिराला लागून तळभागात एक पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे.हरिश्चंद्रगडावर येणारे प्रवासी याच पाण्याचा पिण्यासाठी वापर करतात.

सप्ततीर्थ आणि पुष्कर्णी - हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूला भगवान विष्णूच्या अवतारांची चौदा छोटी मंदिरे आहेत.त्या मंदिरांच्या उजवीकडील वास्तूंची पडझड झाली आहे.या चौदा छोट्या मंदिरांच्या समोर एक  पुष्कर्णी आहे. पुष्कर्णीच्या चहुबाजूला दगडात बांधकाम केलेले आढळते.

कोकणकडा- हरिश्चंद्रगडाच्या पश्चिमेला अर्धवर्तुळाकार आकारात नैसर्गिकरित्या डोंगर तुटून तयार झालेला सरळसोट कडा हजार मीटर खाली कोकणात उतरतो,तो कडा म्हणजेच  कोकणकडा.कोकणकडा त्याच्या अंतर्वक्र आकारामुळे आणि उभ्या ताशीव कड्यामुळे वर्षानुवर्ष पर्यटकांच्या पसंतीस उतरतो आहे.कोकणकड्याच्या डाव्या बाजूला दिसणारी रोहिदास आणि तारामती ही शिखरे त्याच्या सौंदर्यात अधिक भर घालतात.कोकणकड्याच्या समोरच्या बाजूला त्या उंचीचा एकही डोंगर जवळपास नसल्यामुळे पश्चिमेकडून येणारा भन्नाट वारा अगदी कडक उन्हाळ्यातसुद्धा आनंददायक अनुभव देतो.
कधीकधी हा वारा इतक्या वेगाने वहातो की एखादी हलकी वस्तू दरीच्या दिशेने भिरकावली असता,ती उलटी कोकणकड्यावर येऊन पडते.

कोकणकड्यावर जाण्याचा मार्ग हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूने सुरु होतो. प्रथम खडी चढण पार केल्यावर नंतर घनदाट जंगलातून जाणारी पायवाट आपल्याला दरीच्या समोर आणून सोडते.हरिश्चंद्रेश्वर मंदिरापासून कोकणकड्यावर येण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो.ही पायवाट अंतर्वक्र आकाराच्या मध्यभागी कोकणकड्यावर आणते.कोकणकड्याच्या दोन्ही टोकांवर जाण्यासाठी प्रत्येकी वीस मिनिटे लागतात.

कोकणकडा पश्चिमेला असल्यामुळे इथून सुर्यास्त बघता येतो.मावळतीला जाणारा सुर्य पहाण्यासाठी आणि आपल्या कॅमेर्‍यात टिपण्यासाठी इथे सुर्यास्ताच्या वेळेस पर्यटकांची गर्दी होते.

कोकणकड्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथून पाहता येण्यासारखे ' इंद्रवज्र '. पावसाळ्यात सकाळच्या सुमारास कोकणकड्याच्या समोरच्या दरीत धुके आणि ढग असताना,सुर्याचे किरण हे आपल्यावर पडतात आणि मागील ढगांवर आपली सावली पडते आणि आपल्या भोवती इंद्रधनुष्याच्या रंगांचे वलय दिसते.याला इंग्रजीत 'Broken Spectre' असे म्हणतात.

हरिश्चंद्रगडावर येताना तंबू घेऊन आल्यास कोकणकड्यावर तंबू ठोकून वास्तव्य करता येते.पावसाळ्यात दाट धुक्यामुळे कड्याचे टोक लक्षात न आल्यास जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे कोकणकड्यावर दरीच्या बाजूला संरक्षणासाठी लोखंडी रेलींग लावले आहे.

केदारेश्वर गुहा - ही गुहा हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला आहे.या गुहेच्या मध्यभागी मोठे शिवलिंग आहे.या शिवलिंगापर्यंत जाण्यासाठी गुहेतील थंडगार पाण्यातून जावे लागते.या शिवलिंगाच्या नक्षीकाम केलेले चार खांब होते (सध्या त्यातील एकच खांब चांगल्या अवस्थेत आहे आणि उर्वरित खांब मोडकळीस आलेले आहेत).या गुहेच्या दोन्ही बाजूंना खोल्या आहेत. हरिश्चंद्रगडावर उगम पावणारी मंगळगंगा नदीचे उगमस्थान हे या गुहेच्या शेजारी आहे.

 वास्तव्य 

हरिश्चंद्रगड एका दिवसात बघून परत मुंबई किंवा पुण्याला परतणे खूप दगदगीचे ठरते, त्यामुळेच हरिश्चंद्रगडावर एक दिवसाचा मुक्काम केला तर गड व्यवस्थित बघता येतो.सकाळी पायथ्याच्या गावी पोचून दुपारपर्यंत गडावर पोचल्यास संध्याकाळी कोकणकड्यावरील सुर्यास्त बघून दुसऱ्या दिवशी सकाळी इतर ठिकाणे बघून रात्रीपर्यंत मुंबई किंवा पुण्याला पोचता येते.

हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या मागे असलेल्या गुहांमध्ये ८ ते १० जणांची रहायची सोय होईल.हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या उजवीकडे  सप्ततीर्थाच्या वरील डोंगरात काही गुहा आहेत.या गुहांना तेथे असलेल्या गणपती मंदिरामुळे  'गणेश गुहा' असे म्हणतात.हरिश्चंद्रगडाला भेट देणारे पर्यटक येतानाआपल्याबरोबर तंबू घेऊन कोकणकड्यावर वास्तव्य करू शकतात.याखेरीज पाचनई गावातील लोक उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात (रविवारी) गडावरील होणारी गर्दी लक्षात घेऊन गडावर वास्तव्याची आणि जेवणाची सोय करतात.
हरिश्चंद्रगडावर जेवणाची इतर काहीच सोय नसल्याने 
पर्यटकांना ती स्वतःच करावी लागते.हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या जवळच्या टाक्यांमधील पाणी पिण्ययोग्य आहे.

कधी जावे -

हरिश्चंद्रगड वर्षभर पर्यटकांसाठी खुला असून वर्षभरात कधीही इथे भेट देता येते (एप्रिल आणि मे महिना वगळता).
 
हिवाळा  - हरिश्चंद्रगडावर हिवाळ्यात जाणे पावसाळ्यापेक्षा तुलनेने सोपे असल्यामुळे बरेच पर्यटक हिवाळ्यात हरिश्चंद्रगडावर जाणे पसंत करतात. हिवाळ्यात धुक्याचे प्रमाण पावसाळ्यापेक्षा कमी असल्याने कोकणकड्यावरून कोकणातील विस्तीर्ण परिसर पाहता येतो.मोकळ्या आल्हाददायक हवेमुळे विशेष करून छायाचित्रणकार (Photographers) हिवाळ्यात हरिश्चंद्रगडावर जाणे पसंत करतात. हरिश्चंद्रगडावर जाताना तंबू सोबत घेतल्यास 
कोकणकड्यावर वास्तव्य करता येते.

उन्हाळा - उन्हाळ्यात उष्ण वातावरणामुळे आणि पाण्याच्या टंचाईमुळे पर्यटक फारसे हरिश्चंद्रगडावर येणे  पसंत करत नाहीत.हरिश्चंद्रगड हा गजबजाटापासून दूर असल्याने इथून आकाशदर्शन खूप चांगल्या प्रकारे होते.
उन्हाळ्यात हवेतील आर्द्रता (Humidity) हिवाळा आणि पावसाळ्याच्या तुलनेने कमी असल्याने आकाशदर्शनासाठी हा काळ सर्वात उत्तम असतो.

पावसाळा - आल्हाददायक वातावरण आणि दाट धुक्याचे आच्छादन यामुळे हरिश्चंद्रगडाला पावसाळ्यात भेट देणे हा एक आनंददायक अनुभव असतो.याखेरीज 
इंद्रवज्राचा अनुभव घेण्यासाठी पावसाळ्यातील हरिश्चंद्रगडाला दिलेली भेट हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.

 माझा अनुभव 

मी माझ्या १० मित्रांबरोबर हरिश्चंद्रगडाला २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २००९ या दिवशी भेट दिली होती.आम्ही हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या खिरेश्वर गावात जाण्यासाठी २७ फेब्रुवारीला मुंबईतून एका खाजगी वहानाने आमच्या प्रवासाचा श्रीगणेशा केला.माळशेज घाटाच्या मार्गाने आम्ही सकाळी ६.०० वाजता खिरेश्वर गावात पोचलो. सुर्योदय होत असताना  संपूर्ण गाव हळुवार दृष्टीस पडत होते.ऐन उन्हाळ्याचे दिवस असूनही हवेत पहाटेचा गारवा जाणवत होता.आम्ही हरिश्चंद्रगडाकडे कूच केले.साधारण अर्धा तास मोठमोठ्या खडकांमधून जाणारी पायवाट एका अजस्र कातळाच्या पुढे येऊन संपली.आम्हाला चुकीच्या वाटेवरून मागील अर्धा तास भटकत असल्याची उपरती झाली.आलेल्या वाटेने परत फिरून पुन्हा जिथून सुरुवात केली तिथे आम्ही परत आलो.आम्हाला तिथे एक गावकरी भेटला.त्याला आमची अडचण सांगीतल्यावर तो आमच्या सोबत वाटाड्या म्हणून येण्यास तयार झाला.

आम्ही ज्या ठिकाणाहून डावीकडील रूंद वाटेने आधी गेलो होतो त्यासमोरच असलेल्या झाडांमध्ये एक अरुंद  पायवाट होती.ही पायवाट एका वेळेस एकच माणूस त्या वाटेवरून चालू शकेल इतकीच रूंद होती.आम्ही रस्ता चुकून वाया दवडलेल्या एक तासामुळे आता चांगलेच तापायला सुरुवात झाली होती.एका घनदाट जंगलातून जात असल्याने आम्हाला ऊन लागत नव्हते पण हवेतील उष्णता जाणवत होती.पायवाट मध्यम चढाची होती पण सोपी होती.

आम्ही टोलारखिंडीत ८.१५ वाजता दाखल झालो. टोलारखिंड ही इंग्रजी ' व्ही ' आकाराची खिंड खिरेश्वर गावातून सहज ओळखता येते.या खिंडीतून सरळ जाणारी वाट पलीकडच्या कोठाळे गावात उतरते आणि डावीकडील चढणीची वाट ही आपल्याला हरिश्चंद्रगडावर आणून सोडते.टोलारखिंडीत साधारण १५ मिनिटांच्या विश्रांतीनंतर आम्ही डावीकडील कातळामधील वाटेवरून हरिश्चंद्रगडाकडे प्रयाण केले.
डावीकडे वळून काही वेळातच आपल्याला कातळामधून जाणारा राॅक पॅच दिसतो.हा राॅक पॅच चढताना एका बाजूला खोल दरी आणि दुसर्‍या बाजूला कातळकडा असल्याने विशेषतः उन्हाळ्यात चक्कर येण्याची शक्यता असते.यावर उपाय म्हणून टोलारखिंडीत पुरेसे पाणी पिऊन आणि ज्यांना चक्कर येण्याचा त्रास असेल त्यांनी गोळ्या घ्याव्यात.राॅक पॅच चढताना चक्कर येत आहे असे वाटल्यास जागीच थोडे थांबून मग बरे वाटल्यावर पुन्हा सुरुवात करावी.राॅक पॅच हा नवख्या ट्रेकर्ससाठी अवघड असल्याने जपून पार करावा.राॅक पॅच चढण्यास अर्धा तास ते ४५ मिनिटे लागतात.पावसाळ्यात या भागात दाट धुके असल्याने दरी दिसत नाही.अशावेळेस आपल्या पुढे असलेल्या ट्रेकर बरोबर संवाद साधून आणि त्याप्रमाणेच आपल्या मागे असलेल्या ट्रेकरना मार्गदर्शन करून राॅक पॅच पार करावा लागतो.पावसाळ्यात गावातून एखादा माहितगार सोबत घेऊन वर येणे योग्य ठरेल.

राॅक पॅच पार केल्यानंतर सपाटीच्या भागाला सुरुवात होते.राॅक पॅच पार करताना फार दमछाक होते त्यामुळे सपाटीच्या भागावर आपण थोडी विश्रांती घेऊन पुढे मार्गक्रमण करू शकतो.आम्ही ९.१५ वाजता राॅक पॅच पार करून थोडी विश्रांती घेतली.समोर पिंपळगाव जोगा धरणाची भिंत दिसत होती आणि पहाटे आम्ही ज्या रस्त्याने आलो तो खिरेश्वर गावात धरणाच्या भिंतीच्या बाजूने येणारा रस्ता दिसला.समोर जुन्नर तालुक्यातील डोंगरांची रांग दिसली.यातील एका डोंगरावर हटकेश्वर या नावाचे एक शिवमंदिर आहे.या शिवमंदिरासमोर असंख्य नंदी आहेत.विश्रांती घेऊन आम्ही ९.३० वाजता पुढील मार्गावरून निघालो.

हरिश्चंद्रगडावर खिरेश्वरहून येताना एक कठीण राॅक पॅच सोडल्यास बाकीचा मार्ग सोपा आहे.पुढे हरिश्चंद्रेश्वर मंदिरापर्यंतचा रस्ता हा छोट्या छोट्या टेकड्यांच्या वाटेवरून जात असल्याने कमी उंचीचे चढ आणि उतार वगळता बाकीचा रस्ता सपाटीवरून जाणारा आहे.या रस्त्यावरून जात असताना कडक ऊन लागले.
कडक उन्हातून चालत असताना मध्येच सावलीत काही क्षणांची विश्रांती घेत घेत आम्ही ११.४५ वाजता हरिश्चंद्रेश्वर मंदिराजवळ पोचलो. उन्हाळ्याच्या दिवसात फार कुणी हरिश्चंद्रगडावर फिरकत नाही.आम्हाला रहाण्यासाठी मुख्य मंदिराच्या मागे (मंदिराच्या  आवारात) असलेली गुहा मिळाली.पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ही गुहा क्वचितच मिळते.आम्ही गुहेत आमच्या मोक्याच्या जागा काबीज केल्या आणि गुहेतील शांत वातावरणात थोडासा आराम केला.आम्ही
खूप थकलो होतो आणि प्रचंड थकल्यावर गुहेतील थंडगार काळ्या पाषाणावर बसल्यावर शांत वाटते.
साधारणपणे दुपारी १ - १.३० वाजता जेवायला बसलो.आम्ही आमच्यासोबत जेवण आणले होते. रात्रीचा प्रवास झाल्याने दुपारचे जेवण झाल्यावर गुहेत ३ तास झोप काढली.झोपून उठल्यावर चहा घेऊन आम्ही कोकणकड्याकडे निघालो.कोकणकड्यावर जाताना जंगलातून गेल्याने बर्‍यापैकी गारवा जाणवला.
साधारण संध्याकाळी ५.३० वाजता आम्ही
कोकणकड्यावर पोचलो. कोकणकड्याच्या दोन्ही वक्र बाजूस थोडी टेहळणी करून आम्ही कोकणकड्याच्या मध्यभागी आलो.संध्याकाळचे ६.१५ वाजत होते,संपूर्ण जगाला अखंडित उर्जा देणारा सुर्य अस्ताला जात होता.अस्ताला जाणारा सुर्य हा कसोटी सामन्यात एक मोठी खेळी खेळून दिवस संपल्यावर पॅव्हेलियनमध्ये परतणाऱ्या फलंदाजासारखा दिसत होता. उद्या पुन्हा येऊन त्याला झळकावे लागणार होते.

कोकणकड्यावरील सुर्यास्त हा खासच होता.एकीकडे सुर्य अस्ताला जात असतानाच कड्यावरील भन्नाट वारा आम्ही अनुभवत होतो.हा वारा इतका भन्नाट असतो की रिकामी प्लॅस्टिकची बाटली कड्यावरून खाली फेकल्यास ती पुन्हा कड्यावर येऊन पडते.  
कोकणकड्यावरील विहंगम दृश्याचे छायाचित्रण करून आम्ही ७.०० वाजता पुन्हा हरिश्चंद्रेश्वर मंदिराकडे पोचलो.हरिश्चंद्रगड हा मुख्य रस्त्यापासून लांब असल्याने इथे तुलनेने प्रदूषण फार कमी असते.आम्ही ७.३० वाजताच रात्रीचे जेवण झाल्यावर आकाशदर्शनासाठी मंदिरातील आवाराच्या बाहेर आलो.आकाश शुभ ताऱ्यांनी भरलेले होते.प्रत्येक तारा न्याहाळत वेळ कसा निघून गेला ते कळलेच नाही.रात्रीचे ९.००-९.१५ वाजले असतील आणि आम्ही मंदिरात परतलो.मंदिरात पालखी ठेवली होती.रात्री मेंढीकोटचे काही डाव खेळून झाल्यावर आम्ही त्या गुहेत झोपलो.गुहेतील त्या थंड वातावरणात आणि शांत भवतालात खूप छान झोप लागली.मुंबई-पुण्यासारख्या शहरी वातावरणात अशी झोप दुरापास्तच !
सकाळी ५.३० वाजताच जाग आली (खूप दिवसांनी झोप पूर्ण होऊन जाग आल्याचा अनुभव आला,नाहीतर नेहमीच घड्याळाच्या गजराने जाग येते).सकाळी प्रातर्विधी आटोपून आम्ही चहा घेतला ( चूल पेटवून त्यात चहा केला) आणि चांगला पोटभर नाश्ता करून आम्ही केदारेश्वर गुहा पाहिली.मंदिराच्या जवळच असलेली पुष्कर्णी आणि सप्ततीर्थ पाहिले.काही बेजबाबदार पर्यटकांमुळे तेव्हा पुष्कर्णी आणि सप्ततीर्थाची रया गेली होती.त्याचे पुनरूत्थान करण्याचा प्रयत्न गेली कित्येक वर्षे सुजाण ट्रेकर्स करत आहेत आणि त्याला बर्‍यापैकी यश आल्याचे ऐकिवात आहे.

आम्ही आमचा परतीचा प्रवास १०.३० वाजता सुरू केला.हरिश्चंद्रगडावरून खाली उतरताना आम्ही पाचनईच्या वाटेने उतरायचे ठरवून आमच्या वाहन चालकाला पाचनईला येण्यासाठी फोन केला.पाचनईची वाट ही घनदाट जंगलातून जाते त्यामुळे बर्‍यापैकी
 सावली लागणार होती.पाचनईच्या वाटेने जंगलात शिरलो आणि मातीच्या पायवाटेवरून भराभर उतरू लागलो.एका बाजूला हरिश्चंद्रगडाचा अजस्र पहाड उभा ठाकलेला होता.हरिश्चंद्रगडावर उगम पावणार्‍या मंगळगंगा नदीचा प्रवाह आटला होता.थोड्याच वेळात हा मार्ग एका दरीपाशी आला आणि समोर कलाडगड आणि खाली पाचनई गावातील टुमदार घरे दिसू लागली. इथून डावीकडे पायवाट अरुंद झाली आणि एका बाजूला दरी आणि दुसर्‍या बाजूला खडी भिंत अशा पायवाटेवरून उतरत आम्ही ११.४५ वाजता पाचनई गावात पोचलो.उतरताना काही ठिकाणी डोंगर फोडून पायवाट जाते तिथे आम्ही विश्रांती घेतली.खाली उतरलो आणि वाहनासाठी वाहन चालकाला फोन लावायचा प्रयत्न केला (कुणाच्याच मोबाईलला रेंज नसल्याने फोन लागला नाही).बराच वेळ थांबल्यानंतर आम्ही रस्त्याने चालायला सुरुवात केली.दुपारी १२.३० ची वेळ होती आणि कडक उन्हातून आम्ही चालत होतो.रस्ता चढ उताराचा होता,बर्‍यापैकी निर्जन होता
आणि वाटेत फारच कमी झाडे होती त्यामुळे थकवा जाणवत होता.बराच वेळ चालून झाले तरी वहान न आल्यामुळे सगळ्यांच्या मनात चिंता आणि भिती वाढत होती.शेवटी आम्ही त्या डांबरी रस्त्यावर काही काळ झाडाच्या सावलीत बसलो आणि काही वेळातच आम्हाला आमचे वाहन येताना दिसले.आमचा आनंद गगनात मावेनासा झाला.आम्ही त्या वाहनात चढून निश्वास टाकला.आम्हाला प्रचंड भूक लागली होती.आम्ही दुपारचे जेवण ४.०० वाजता ओतूर गावात  आटोपून मुंबईला माळशेज घाट मार्गे ९.३० वाजता पोचलो.एक शेवटचा अनुभव सोडल्यास आमचा ट्रेक अतिशय आनंददायी आणि समाधानकारक झाला.

सामग्री

एका दिवसाच्या ट्रेकसाठी - चांगले ट्रेकिंग बूट (पावसाळ्यात जाताना सहजासहजी घसरणार नाहीत असे),खांद्याला अडकवायची दोन पट्टे असलेली बॅग,बदलण्यासाठी एक जोडी कपडे,पाणी ( १-२ ली.) विजेरी,छोटी सुरी,पॅकबंद खाण्याचे पदार्थ,मेडिकल किट(इलेक्ट्रॉल पावडर +कापूस +जखमेवरील मलम+ताप,मळमळ,चक्कर यावरील औषध),प्रत्येकाची रोजची औषधे,रूमाल,पंचा,नॅपकीन, रोज अत्यावश्यक असलेल्या गोष्टी

दोन किंवा अधिक दिवसांच्या ट्रेकसाठी - 
एका दिवसाच्या ट्रेकसाठी वर नमूद केलेली सर्व सामग्री 
+झोपण्यासाठी स्लिपींग बॅग अथवा मॅट (गडांवर वास्तव्य करताना गुहांमध्ये रहावे लागते म्हणून साध्या चटईऐवजी फोमची चटई असल्यास चांगले), टूथपेस्ट आणि ब्रश,तुमच्या सोयीनुसार आणि आवडीनुसार इतर आवश्यक सामग्री

छायाचित्रे -

 




हरिश्चंद्रगडाचा नकाशा


खिरेश्वर रस्त्यावरून हरिश्चंद्रगड प्रथम दर्शन 
                                                          
    
 
खिरेश्वरकडे जाणारा रस्ता
    
 
हरिश्चंद्रगडावरील नेढं (भिकबाळीचे छिद्र)
      
 
इंग्रजी 'व्ही' आकाराची टोलारखिंड 
                                                                       
            

राॅक पॅच (टोलारखिंडीच्या वर)
          

पिंपळगाव जोगा धरण आणि तलाव 

 हरिश्चंद्रेश्वर मंदिर 
                                                            
         
हरिश्चंद्रेश्वर मंदिर (मुख्य मंदिर आणि नंदी)
 
हरिश्चंद्रेश्वर मंदिरातील वास्तू  (कृष्णधवल)

केदारेश्वर गुहा आणि शिवलिंग
                                                                
        
 सुर्यकिरणातील सप्ततीर्थ आणि पुष्कर्णी (कृष्णधवल)

कोकणकडा (अंतर्वक्राच्या एका बाजूने टिपलेली दुसरी बाजू)

कोकणकड्यावरील सुर्यास्त 


 पाचनईच्या वाटेवर


Note - 

१) किल्ल्यांवरील विविध वास्तू , शिल्पे,गुहा       
    आणि  मंदिरे हा आपला सांस्कृतिक वारसा        
    आहे.या ठिकाणांना भेट देताना तिथे कचरा  
    होणार नाही याची खबरदारी घ्यावी.दरवर्षी      
    काही ट्रेकर्स  वेगवेगळ्या गडांवर स्वच्छता  
   मोहीम राबवतात आणि प्रचंड प्रमाणात कचरा  
   पायथ्याच्या गावांना आणावा लागतो.आपण 
   कुठल्याही ऐतिहासिक महत्त्व असलेल्या 
   ठिकाणांना भेट देताना आपल्याजवळ एक 
   पिशवी ठेवावी आणि परतताना सगळा कचरा 
   त्या पिशवीत भरून पायथ्याच्या गावातील 
   कचरापेटीत टाकावा. 

2) आपणास विनंती आहे की जंगलातून प्रवास करताना मोठमोठ्या आवाजात गाणी ऐकून पक्ष्यांच्या रोजच्या आयुष्यात व्यत्यय आणू नये.

3) कृपया कुठल्याही ऐतिहासिक ठिकाणी सहलीला किंवा ट्रेकिंगला जाताना आपल्यासोबत आपल्या संख्येनुसार कचऱ्याच्या पिशव्या बाळगाव्यात.दिवसभरात जमणारा सगळा कचरा त्या कचऱ्याच्या पिशव्यांमध्ये जमा करून त्या पिशव्या पायथ्याच्या गावातील मोठ्या कचरापेटीत टाकव्यात.

4) गुहेतील भिंती, देवळाच्या भिंती आणि प्राचीन कारागिरांनी अतिशय मेहनतीने कोरलेल्या 
ऐतिहासिक भिंती यावर आपली कला सादर करू नये.
                                                                

2 comments:

  1. Very informative information is provided. This will definitely benefit all the Trekkers...
    👍🏼👍🏼👍🏼

    ReplyDelete

10 Things to Remember while Trekking in Maharashtra / Sahyadri

Types of places you visit in Hikes/Treks The treks in Sahyadri include   a) Forts - Historic Importance  Unlike Forts in Rajasthan,forts in ...